गेशा
जपानमधील मोठमोठ्या सार्वजनिक उपाहारगृहांतून, विशेषतः मेजवान्यांच्या प्रसंगी, स्त्रियांशी घरगुती सलगीने व पुरुषांशी सौम्य शृंगारिक रीत्या वागून नृत्यगायनाने किंवा चतुर संभाषणाने मनोरंजन करण्याचे कार्य ज्या स्त्रिया करतात, त्यांना ‘गेशा’ म्हणतात. गेशा म्हणजे कलाकार किंवा कलावंतीण. बहुतेक गेशा संभाषणचतुर असतात. त्यांचे मुख्य कार्य वातावरण उल्हसित व सुखद करण्याचे असते.
त्यांचा पोशाख अत्यंत आकर्षक व नीटनेटका असतो. त्यांना सर्व गावगप्पांची माहिती असते. गेशाविषयक शिक्षण देणाऱ्या संघटना असून त्या मुलींना लहान वयापासूनच विविध प्रकारचे शिक्षण देतात. त्याबद्दल मुलींच्या पालकांकडून शुल्क आकारले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर उद्योगात पैसे कमवून गेशा त्याची भरपाई करते. एका नृत्याचा मोबदला म्हणून अनुभवी गेशा शेकडो डॉलर घेतात तर नव्याने व्यवसायास लागलेल्यांना तासाचे काही डॉलरच मिळतात.
गेशांच्या नाट्यसृष्टीशीही नेहमी संबंध येतो व कधीकधी त्यांना नायिकेचेही काम मिळते. विवाह केल्यास गेशा व्यवसायातून निवृत्त होतात अन्यथा सर्वसाधारणपणे उतारवयात त्या उपाहारगृहांची मालकी पत्करतात. नृत्य व गायन शिकविणे अथवा नवीन गेशा तयार करणे, हे व्यवसायही त्या करतात.
जपानी साहित्यात शृंगारिक कथेची नायिका बहुधा गेशाच असते. जपानी जीवनात ‘गेशा’ ही संस्था बरीच वर्षे असूनही, तिच्यामुळे जपानी कौटुंबिक जीवनाला काहीच धक्का पोहोचलेला नाही, हे विशेष आहे.